राज्यात मान्सूनचा प्रवास रखडला : १५ जूनपर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज

पूर्व विदर्भात तापमान ४५ अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता ; शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचे आवाहन
मुंबई : गेल्या जवळपास दोन आठवड्यांपासून राज्यातील मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला असून, किमान १५ जूनपर्यंत तरी तो रखडलेलाच राहणार आहे. यामुळे १४ जूनपर्यंत पश्चिम किनारपट्टी वगळता राज्यातील विविध भागांमधील तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील कमाल तापमान अधिक राहण्याचा अंदाज आहे. या दरम्यान, पूर्व विदर्भात कमाल तापमानात अजून वाढ होऊन ते ४५ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे, तर विदर्भातील बऱ्याच भागात कमाल तापमान ४० अंशांपेक्षा अधिक राहणार असल्याचा अंदाज आहे. मराठवाडा आणि खानदेशातील अनेक भागात कमाल तापमान ४० अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
१४ जूनपर्यंत राज्यात सार्वत्रिक आणि मान्सूनचा पाऊस अपेक्षित नाही. पाऊस हा प्रामुख्याने दुपारनंतर आणि मेघगर्जनेसह काही भागातच पडेल, ज्याची शक्यता या आठवड्याच्या सुरुवातीला दक्षिण मराठवाडा आणि दक्षिण मध्य-महाराष्ट्रात अधिक राहील. तुलनेत राज्यातील इतर भागात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे.
या दरम्यान कमाल तापमान अधिक राहणार असल्यामुळे आणि सार्वत्रिक मान्सूनचा पाऊस अपेक्षित नसल्यामुळे शेतकऱ्यांनी (प्रामुख्याने कोरडवाहू) पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी पुरेशा पावसानंतरच पेरणी सुरू करावी, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.



