
पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या इंधन बचतीच्या आवाहनाला महावितरणचा कृतीशील प्रतिसाद; मुख्यालयातील सर्व १० नवीन ‘ईव्ही‘ ताफ्यात दाखल
नागपूर : पश्चिम आशियातील वाढत्या संकटामुळे निर्माण होणारी इंधन टंचाई आणि पर्यावरणाचे रक्षण या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्युत वाहनांच्या (EV) वापराचे आवाहन केले आहे. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत महावितरणने आपल्या वरिष्ठ व्यवस्थापनात मोठा बदल केला आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्यासह सर्व संचालक आणि कार्यकारी संचालकांनी आता पेट्रोल-डिझेल वाहनांचा त्याग करून विद्युत वाहनांचा वापर सुरू केला आहे.
राज्य शासनाच्या विद्युत वाहन धोरण २०२५ नुसार महावितरणने आपल्या ताफ्यात बदल करण्याची प्रक्रिया वेगवान केली आहे. या अंतर्गत गुरुवारी (१४ मे) नवीन विद्युत वाहने उपलब्ध झाली असून, सचिन तालेवार (संचालन/प्रकल्प), अनुदीप दिघे (वित्त), योगेश गडकरी (वाणिज्य), राजेंद्र पवार (मानव संसाधन) या संचालकांनी तात्काळ या वाहनांचा वापर सुरू केला आहे.
यापूर्वीच अध्यक्ष लोकेश चंद्र आणि प्रादेशिक विभागांचे सहव्यवस्थापकीय संचालक तसेच कार्यकारी संचालकांनी ‘ईव्ही’ वाहनांचा स्वीकार केला आहे. गेल्या आठवड्याभरात एकूण १० नवीन विद्युत वाहने महावितरणच्या ताफ्यात दाखल झाली आहेत.
केवळ मुख्य कार्यालयच नव्हे, तर महावितरणच्या राज्यातील सर्व स्तरांवरील कार्यालयांमध्ये हा बदल लागू केला जात आहे. राज्यातील सर्व मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपविभागप्रमुख यांच्या कार्यालयात यापुढे पेट्रोल किंवा डिझेल वाहनांऐवजी केवळ विद्युत वाहने भाड्याने घेणे किंवा खरेदी करण्याच्या प्रक्रियेला वेग देण्यात आला आहे.
जागतिक राजकीय अस्थिरतेमुळे इंधनाचे दर आणि उपलब्धतेवर होणारा परिणाम पाहता, विजेवर चालणारी वाहने हाच सर्वोत्तम पर्याय असल्याचे महावितरणने सिद्ध केले आहे. या निर्णयामुळे महावितरणचा इंधनावरील मोठा खर्च वाचणार असून कार्बन उत्सर्जनातही मोठी घट होणार आहे. महावितरणने स्वतः पुढाकार घेतल्यामुळे राज्यातील इतर शासकीय विभागांसाठीही हा एक आदर्श पायंडा ठरला आहे.



