८४० किलो मोहफुल सडव्यासह ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त

पोलीस आणि मुक्तिपथची संयुक्त कारवाई ; एका दारू विक्रेत्याला अटक
गडचिरोली : तालुक्यातील अवैध दारूविक्रीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या चांदाळा गावात गडचिरोली पोलीस आणि ‘मुक्तिपथ’ने संयुक्त कारवाई करून मोठा अवैध दारूसाठा जप्त केला आहे. या कारवाईत ४० लिटर मोहफुलाची दारू आणि सात ड्रममध्ये ८४० किलो मोहफुलाचा सडवा असा एकूण ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी सुभाष आनंदराव किरंगे (वय ३७) या दारू विक्रेत्याला अटक करण्यात आली आहे.
चांदाळा गाव हे अवैध दारूविक्रीचे केंद्र बनले आहे. गोपनीय माहितीच्या आधारे गडचिरोली पोलीस आणि मुक्तिपथ तालुका चमूने चांदाळाच्या जंगल परिसरात शोधमोहीम राबवली. त्यावेळी डोंगराच्या कडेला असलेल्या एका नाल्याजवळ एक विक्रेता दारू काढताना आढळून आला. पोलिसांनी त्वरित कारवाई करून दारू आणि दारू बनवण्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले.
गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. यामध्ये पोलीस कर्मचारी प्रेमकुमार भगत, आरती वाट, प्रेमलीला चव्हाण, मीना मिठ्ठावार, हर्षल पुराम आणि मुक्तिपथचे रेवनाथ मेश्राम, मेघा गोवर्धन, राहुल महाकुलकर यांच्यासह इतर सदस्यांनी सहभाग घेतला. या कारवाईमुळे अवैध दारूविक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.



