
शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
देसाईगंज : शहराजवळ वैनगंगा नदीकाठी १४ रोजी एका शेतकऱ्यावर हल्ला चढविणाऱ्या पट्टेदार वाघाचे फरीजवळ १५ रोजी काही शेतकऱ्यांना दर्शन झाले. या वाघाच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी वनविभागाने ठिकठिकाणी ट्रॅप कॅमेरेही लावले आहेत.
तालुक्यातील कोंढाळा, रवी गावालगत जंगलव्याप्त परिसरात वाघाचे नेहमीच वास्तव्य आढळलेले आहे. त्या भागात नेहमीच वनविभाग ट्रॅप कॅमेरे लावून वाघावर, त्याचे हालचालीवर लक्ष ठेवून जरी असले तरी नागरिक भयभीत आहेत. दरम्यान देसाईगंजजवळ गणपत नखाते या शेतकऱ्यावर हल्ला केलेला वाघ फरी जंगलाजवळ आढळून आला.
सध्या रबी हंगामाची लगबग सुरू आहे, धरणाचे पाणी सुटलेले असून शेतकरी आपल्या बांधावर शेतीतील कामे करण्यासाठी जात आहेत. मात्र, वाघाचे अस्तित्व आढळून आल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.



