
विद्यार्थी आंदोलनाला मोठे यश; आझाद समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी व विविध संघटनांचा सहभाग
गडचिरोली : दिल्ली येथील जंतरमंतरवर सुरू असलेल्या तीव्र विद्यार्थी आंदोलनाला अखेर मोठे यश मिळाले असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. देशभरात पेटलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिल वृत्त समोर येतातच गडचिरोली शहरात विविध विद्यार्थी, राजकीय आणि सामाजिक संघटनांच्या वतीने जोरदार आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
राजीनाम्याच्या बातमीचे तीव्र पडसाद गडचिरोलीत उमटले. शहरातील मध्यवर्ती इंदिरा गांधी चौकात आझाद समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी, शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) या राजकीय पक्षांचे पदाधिकारी, विविध संघटनांचे कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने एकत्र आले. कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात, जोरदार घोषणाबाजी करत आणि फटाक्यांची आतषबाजी करत या निर्णयाचे स्वागत केले.
“हा विजय कोणत्याही एका राजकीय पक्षाचा नसून देशातील विद्यार्थ्यांच्या अभूतपूर्व एकजुटीचा आणि लोकशाही मार्गाने दिलेल्या संघर्षाचा विजय आहे,” अशी प्रतिक्रिया यावेळी आंदोलकांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या न्याय्य प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष करणाऱ्या सरकारला देशातील तरुण आणि विद्यार्थी शक्तीने जनआंदोलनाची खरी ताकद दाखवून दिली आहे, असे मत उपस्थितांनी मांडले.
आनंदोत्सव साजरा करताना आंदोलकांनी पुढील भूमिकेविषयी स्पष्ट संकेत दिले. देशातील संपूर्ण शिक्षण व्यवस्था पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त आणि विद्यार्थीहित जपणारी असावी. पेपरफुटी, परीक्षांमधील गैरव्यवहार आणि शैक्षणिक घोटाळ्यांवर कायमस्वरूपी कडक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली. विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय पूर्णपणे थांबेपर्यंत हा लढा असाच पुढे सुरू राहील, असा निर्धार संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केला. या आनंदोत्सव कार्यक्रमाला विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.



