
बंद घरे लक्ष्य; सोने-चांदी, लॅपटॉप चोरीला गेल्याने नागरिक भयभीत
देवरी : शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घालत शनिवारी (दि. २५) मध्यरात्री प्रभाग क्रमांक २ आणि ८ मध्ये तब्बल आठ ठिकाणी घरफोडी केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी बंद घरांना लक्ष्य करत सोने-चांदी, लॅपटॉप आणि रोख रकमेसह लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. एकाच रात्री झालेल्या या आठ घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, देवरी पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
मध्यरात्री झालेल्या घरफोडीच्या घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या असून, त्यात दोन चोरटे दिसत आहेत. सम्राट बारच्या मागे बाहेर गेलेल्या तलाठी बांते यांच्या घरातील कपाट तोडून चोरट्यांनी दोन तोळे सोन्याचे मंगळसूत्र (किंमत १ लाख ८० हजार रुपये) आणि चांदीच्या पायपट्ट्या व भांडी (किंमत ३० हजार रुपये) असा एकूण २ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. राठोड यांच्या घरातूनही चांदीचे दागिने चोरीला गेले. अॅड. गंगबोडर यांच्या घरातील कुलूप तोडले, पण त्यांना काही मिळाले नाही. सुरभी चौक परिसरात युगेश बिसेन यांच्या ऑफिसमधील लॅपटॉप, डीव्हीआर आणि हजार रुपये चोरट्यांनी नेले. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक मनोज गेडाम यांच्या घरातील कपाट तोडून १० हजार रुपये चोरी केले. गेडाम यांच्या शेजारील हवालदार योगी मुनेश्वर यांच्या घरातून चांदीच्या सहा पायपट्ट्या (किंमत ६०-७० हजार रुपये) लंपास झाल्या.
याशिवाय, लिज्जत पापड कंपनीजवळ चौधरी यांच्या घरी आणि प्रभाग क्रमांक ७ मधील लिल्होरे यांच्या घरीही चोरट्यांनी घरफोडी करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना तिथे काहीच हाती लागले नाही. रात्री सुरू असलेला विजेचा लपंडाव आणि पावसाच्या स्थितीचा फायदा घेत चोरट्यांनी ही चोरी केल्याचे सांगण्यात येत आहे. एकाच वेळी आठ ठिकाणी चोरी झाल्याने देवरी पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.



