
गडचिरोली : वाढत्या लोकसंख्येचे दुष्परिणाम आणि कुटुंब नियोजनाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, गडचिरोलीच्या वतीने ‘जागतिक लोकसंख्या दिन’ जिल्हास्तरीय सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. छाया उईके यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी लोकसंख्या नियंत्रणासोबतच भारताच्या ‘लोकसंख्या लाभांशा’चा कशा प्रकारे देशाला लाभ होऊ शकतो, यावर तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या उद्घाटक डॉ. छाया उईके यांनी तरुण पिढीला सुदृढ आरोग्यासाठी कुटुंब नियोजनाचा अवलंब करण्याचे आवाहन केले. “छोटे आणि सुदृढ कुटुंब हेच सुखी जीवनाचे रहस्य आहे,” असे सांगत त्यांनी कुटुंब नियोजनाच्या पद्धतींचा प्रभावी वापर करण्यावर भर दिला. प्रमुख पाहुण्या डॉ. माधुरी किलनाके यांनी आशा स्वयंसेविका आणि ए.एन.एम. (ANM) यांना गृहभेटीदरम्यान दोन मुलांमध्ये योग्य अंतर ठेवण्याचे महत्त्व पटवून देत, समाजात व्यापक जनजागृती करण्याचे निर्देश दिले.
जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. माधव शिंदे यांनी ‘लोकसंख्या लाभांश’ (Demographic Dividend) या संकल्पनेचे विश्लेषण केले. ते म्हणाले की, भारत सध्या लोकसंख्येच्या ‘सुवर्णकाळातून’ जात आहे (२००५ ते २०५५). १५ ते ६४ वयोगटातील तरुणांची संख्या सर्वाधिक असल्याने या तरुणांना योग्य शिक्षण, आरोग्य सुविधा आणि रोजगाराची संधी उपलब्ध करून दिल्यास भारताचा विकास वेगवान होईल. मात्र, ही संधी न साधल्यास बेरोजगारीसारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात, अशी ताकीदही त्यांनी दिली.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे नर्सिंग प्रशिक्षणार्थींनी काढलेली रांगोळी होती. रांगोळीच्या माध्यमातून त्यांनी वाढत्या लोकसंख्येचे विदारक चित्र आणि त्याचे पर्यावरणावर व समाजावर होणारे दुष्परिणाम अत्यंत प्रभावीपणे मांडले, ज्याचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.
या कार्यक्रमास डॉ. माधव शिंदे, डॉ. नीलकंठ मसराम, डॉ. प्रशांत पेंदाम, कविता पोतरोजवार यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, आशा स्वयंसेविका आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रतिज्ञा रामटेके (पी.एच.एन.) यांनी केले.



