देसाईगंजमधील जिंदाल प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध ; मुख्यमंत्र्यांकडून ‘सुपीक जमीन घेणार नाही’ असे आश्वासन

माजी आ. कृष्णा गजबे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत भेट
देसाईगंज : देसाईगंज तालुक्यातील कुरुड आणि कोंढाळा परिसरात जिंदाल कंपनीचा प्रस्तावित कारखाना सुरू करण्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी तीव्र भूमिका घेतली आहे. आपली कसत असलेली शेती कंपनीला गेल्यास उदरनिर्वाह कसा चालवावा, असा प्रश्न या भागातील शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांच्या या चिंतेच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुपीक जमिनी कोणत्याही परिस्थितीत प्रकल्पासाठी देणार नाही, पर्यायी जागा शोधण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.
जिंदाल कंपनीला या भागातील कोंढाळा, कुरुड, शिवराजपूर, तुळशी, कोकडी, नैनपूर या गावांतील ५६९०.९ एकर जमिनीची आवश्यकता आहे. या जमिनीच्या हस्तांतरणाची प्रक्रिया सध्या जिल्हाधिकारी स्तरावर अंतिम टप्प्यात सुरू आहे. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे, या भागातील अनेक शेतकऱ्यांना आपली जमीन जिंदाल कंपनीला जाणार असल्याची माहितीच नाही. तसेच, पेसा अंतर्गत ग्रामपंचायतींचे किंवा नॉन-पेसा ग्रामपंचायतींचे ठरावही शासन स्तरावर किंवा जिंदाल कंपनीकडून मागण्यात आलेले नाहीत, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. ही हस्तांतरण प्रक्रिया शासनाकडून जोर-जबरदस्तीने सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
या भागातील शेतकऱ्यांचे कुटुंबांचे पालनपोषण पिढ्यानपिढ्या कसत असलेल्या शेतीच्या आधारावर होते. शेतीच्या उत्पन्नावरच मुला-मुलींचे शिक्षण, लग्न आणि इतर आर्थिक व्यवहार अवलंबून आहेत. शासनाकडून तुटपुंज्या पैशांवर या जमिनी खरेदी केल्या जाणार असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे, अशी भीती व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांची ही व्यथा मांडण्यासाठी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गडचिरोली येथे भेट घेऊन निवेदन सादर केले. माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या सूचनेनुसार भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील पारधी यांनी सूत्रे हाती घेऊन बाधित गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांनी निवेदन तयार करून शेतकऱ्यांच्या सह्या घेतल्या आणि तात्काळ जिल्हास्थळी जाऊन मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांची बाजू समजावून सांगितली. या प्रयत्नांबद्दल परिसरातील शेतकऱ्यांनी माजी आमदार कृष्णा गजबे आणि भाजप तालुकाध्यक्ष सुनील पारधी यांचे आभार व्यक्त केले आहेत.
यावेळी शिष्टमंडळात तालुका अध्यक्ष सुनील पारधी, जिल्हा उपाध्यक्ष राजू जेठानी, नरेश विठ्ठलानी, शंकर पारधी, ग्रामपंचायत सदस्य कुरुड अरुण राऊत, माजी ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते रोशन ठाकरे हे प्रामुख्याने उपस्थित होते.
या भेटीदरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या भावना समजून घेतल्या आणि त्यांना दिलासा दिला. “या प्रकल्पासाठी सुपीक जमिनी कोणत्याही परिस्थितीत देणार नाही, पर्यायी जागा शोधण्यात येईल,” असे महत्त्वपूर्ण आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. मुख्यमंत्र्यांच्या या आश्वासनामुळे देसाईगंज तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.



