भंडाराविदर्भ

पीएम स्वनिधी योजनेच्या मुदतीसह कर्ज रकमेत वाढ ; पथविक्रेत्यांनी योजनेचा लाभ घ्यावा – मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण

भंडारा : केंद्र शासनाची पथविक्रेत्यांसाठी असलेली महत्त्वाकांक्षी ‘पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (पीएम-स्वनिधी)’ योजना आता ३१ मार्च २०३० पर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी हा कालावधी ३१ डिसेंबर २०२४ पर्यंतच मर्यादित होता. यामुळे भंडारा शहरातील फेरीवाले, लघुउद्योजक आणि त्यांच्या कुटुंबांना या योजनेचा लाभ घेणे अधिक सोयीचे झाले आहे.

या योजनेत आता कर्जमर्यादा वाढवण्यात आली आहे. पहिला टप्पा: कर्ज मर्यादा १० हजार रुपयांवरून १५ हजार रुपये करण्यात आली आहे. दुसरा टप्पा: कर्ज मर्यादा २० हजार रुपयांवरून २५ हजार रुपये करण्यात आली आहे. तिसरा टप्पा: कमाल कर्ज मर्यादा ५० हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे.

वेळेवर कर्जाचे हप्ते परत करणाऱ्या फेरीवाल्यांना यूपीआय-लिंक्ड रूपे क्रेडिट कार्ड दिले जाईल. यामुळे त्यांना अचानक उद्भवणाऱ्या आर्थिक गरजांसाठी तात्काळ मदत मिळू शकेल. तसेच, डिजिटल व्यवहारांवर १६०० रुपयांपर्यंत कॅशबॅकची सुविधाही उपलब्ध आहे.

या योजनेअंतर्गत फेरीवाल्यांना उद्योजकता, आर्थिक साक्षरता, डिजिटल कौशल्ये आणि मार्केटिंग यांसारख्या विषयांवर विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. शहरातील पथविक्रेत्यांनी आधार शहर उपजीविका केंद्र, मिस्किन टँक गार्डन, भंडारा येथे संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button