
मुक्तिपथ तालुका समितीची बैठक
गडचिरोली : दारू व सुगंधित तंबाखू विक्री सारख्या अवैध व्यवसायांना आळा घालून आपला भामरागड तालुका व्यसनमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वय राखून काम करण्याचे आवाहन नायब तहसीलदार हरिदास सावसागडे यांनी केले.
भामरागड येथील तहसील कार्यालयात ‘मुक्तिपथ’ तालुका समितीची बैठक पार पडली. या बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी तालुक्यातील अवैध दारू आणि तंबाखू विक्रीवर कडक निर्बंध आणण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तालुक्यातील २३ शाळा तंबाखूमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यापैकी १२ शाळा तंबाखूमुक्त असून उर्वरित शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी चर्चा करण्यात आली. यासाठी मुख्याध्यापक यांची कार्यशाळा घेण्याचे ठरविण्यात आले. अवैध दारू आणि गुटखा विक्री करणाऱ्यांवर कडक पोलीस कारवाई करून गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण वाढवले जाईल. गावागावात ग्रामसभा घेऊन अवैध दारू विक्री विरोधात कडक ठराव संमत करण्यावर भर देण्यात येईल. रस्त्यावर गोरगा विक्री बंद करण्याच्या सूचना द्या. पेसा समन्वयक यांच्या माध्यमातून मादक द्रव्य समिती सक्रिय करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तालुक्यातील पोलिस पाटील यांची कार्यशाळा घेण्यासाठी नियोजन करण्यात आले. तालुका मुख्यालयात व ग्रामीण भागात सुगंधीत तंबाखू नष्ट व प्रतिबंधित करण्यासाठी समिती गठीत करण्याचे ठरविले आदी मुद्द्यांवर चर्चा करून अवैध व्यवसायांना आळा घालून तालुका व्यसनमुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
या बैठकीला पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय उजे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीष धकाते, एनसीडी समन्वयक आनंद गावळे, पेसा समन्वयक एस. जी. नैताम, पंचायत समितीचे एस.पी. शेंडे, समाजसेवक चिन्नू महाका, समाजबंध संस्थेचे ऋतुजा सुषमा सुभाष, प्रथमेश, महसूल विभागाचे विवेक कुंभारे, तालुका वैधकीय अधिकारी कार्यालयाचे प्रदीप चलाख, मुक्तिपथचे तालुका संघटिका निळा किन्नाके, उपसंघटक भूपेंद्र सडमेक, तालुका प्रेरक महेंद्र उसेंडी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.



