
किशोरवयीन जीवन कौशल्य शिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण
गडचिरोली : एचआयव्ही/एड्स आणि लैंगिक आजारांविषयी योग्य माहितीचा अभाव हे एक मोठे आव्हान आहे. याच समस्येवर मात करण्यासाठी, गडचिरोली जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाने एक महत्त्वाचा आणि वेगळा उपक्रम राबवला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किलनाके यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय शिक्षक आणि शिक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.
हे प्रशिक्षण ‘किशोरवयीन जीवन कौशल्य शिक्षण कार्यक्रम’ (Adolescent Education Programme – AEP) अंतर्गत देण्यात आले. यामध्ये ८ वी, ९ वी आणि ११ वीच्या विद्यार्थ्यांना विज्ञान विषय शिकवणाऱ्या शिक्षकांचा सहभाग होता.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश १० ते १९ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये एचआयव्ही/एड्सचा प्रतिबंध आणि लैंगिक आजारांविषयी योग्य माहिती पोहोचवून संसर्गाचा प्रसार कमी करणे हा आहे. शालेय शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या जीवन घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात, त्यामुळे त्यांना या विषयाचे प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याचे या प्रसंगी सांगण्यात आले.
किशोरवयीन जीवन कौशल्य शिक्षण कार्यक्रमाची (AEP) ओळख, किशोरावस्था आणि वाढते वय, पौंगाडावस्थेतील प्रजननक्षम आणि लैंगिक आरोग्य, मानसिक आरोग्य समस्या आणि मादक पदार्थांचा दुरुपयोग, एचआयव्ही/एड्स व एसटीआय/आरटीआय विषयी मूलभूत माहिती, एचआयव्ही/एड्स प्रतिबंधासाठी जीवन-कौशल्य, एचआयव्ही/एड्स (प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम – २०१७ या महत्त्वपूर्ण बाबींवर शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले.
प्रशिक्षणानंतर शिक्षकांना माहितीपर IEC साहित्यही देण्यात आले, जेणेकरून ते प्रभावीपणे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू शकतील. या प्रशिक्षण सत्राला महेश भांडेकर (DPO), डॉ. अभिषेक गव्हारे (CSO) – जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक अधिकारी, नागेश मादेशी (ICTC समुपदेशक) यांच्यासह मोठ्या संख्येने शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते.



