गडचिरोलीविदर्भ

पुराच्या वेढ्यात अडकलेल्या एकाच कुटुंबातील तिघांना जीवदान ; ‘एसडीआरएफ’च्या पथकाची थरारक बचाव मोहीम

पामुलगौतम नदी अन् नाल्याच्या मधोमध अडकले होते तीन ग्रामस्थ; जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनंतर तातडीने राबवली रेस्क्यू मोहीम

भामरागड : भामरागड तालुक्यात बुधवारी दिवसभर झालेल्या अतिवृष्टीमुळे पामुलगौतम नदीसह परिसरातील नाल्यांना अचानक पूर आला. या पुरामुळे लाहेरी येथील एकाच कुटुंबातील तीन नागरिक नदी आणि नाल्याच्या मधोमध पुराच्या वेढ्यात अडकून पडले होते. परिस्थिती अत्यंत बिकट बनल्याने जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या सूचनेवरून जिल्हा प्रशासन आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाने (SDRF) तातडीने धाडसी मोहीम राबवून तिघांनाही सुखरूप बाहेर काढले.

बचाव करण्यात आलेल्यांमध्ये नवी केये कुडयामी (वय 40), अर्चना केये कुडयामी (वय 16) आणि अक्षरा केये कुडयामी (वय 3), सर्व रा. लाहेरी, ता. भामरागड यांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुडयामी कुटुंबातील हे तिघे सदस्य बुधवारी सकाळी शेतातील कामासाठी गेले होते. दरम्यान, सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पामुलगौतम नदी आणि जवळच्या नाल्याची पाणीपातळी कमालीची वाढली. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास नदीला मोठा पूर आला आणि नालाही दुथडी भरून वाहू लागल्याने हे तिघेही पाण्याच्या मधोमध अडकले. पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान असल्याने आणि चारी बाजूंनी पाण्याने वेढल्याने ते वाहून जाण्याचा मोठा धोका निर्माण झाला होता.

सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास गावकऱ्यांनी भामरागडचे तहसीलदार किशोर बागडे यांच्याशी संपर्क साधून मदतीची मागणी केली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी विलंब न करता एसडीआरएफ पथकाला तातडीने पाचारण केले. सायंकाळी ७ ते रात्री १० वाजेदरम्यान मुसळधार पाऊस, अंधार आणि पाण्याचा तुफान वेग अशा सर्व प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत SDRF च्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर तिघांनाही सुखरूप बाहेर काढले.

ही बचाव मोहीम यशस्वी करण्यासाठी भामरागडचे तहसीलदार किशोर बागडे, एसडीआरएफचे पीएसआय मंगलसिंग डाबेराव व त्यांचे पथक, तहसील कार्यालयाचे कर्मचारी आणि लाहेरी येथील स्थानिक ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले. वेळेवर मिळालेली माहिती आणि प्रशासनाच्या त्वरित हालचालींमुळे एकाच कुटुंबातील तीन जिवांचे प्राण वाचले असून सर्वत्र SDRF व प्रशासनाचे कौतुक केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button