
गडचिरोलीत लवकरच सुरू होणार ‘CVS तपासणी सेंटर’ – जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे
गडचिरोली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे सिकलसेल व थॅलेसेमिया तपासणी शिबिराचे विशेष आयोजन करण्यात आले. या शिबिरात गरोदर माता (ANC Mothers) आणि सिकलसेल (SS) रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. हे शिबिर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडले.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माता बाल संगोपन अधिकारी डॉ. माधव शिंदे, सामान्य रुग्णालयाच्या अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. छाया उईके, महिला व बाल रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. माधुरी किलनाके, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. प्रशांत आखाडे, RMO डॉ. अमरीश तिवारी आणि अधिपरिचारिका अधिकारी कविता पोतराजवार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना डॉ. माधव शिंदे यांनी सांगितले की, “सिकलसेल रुग्णांनी नियमित तपासणी करून घेणे गरजेचे आहे. तसेच सर्व गरोदर मातांनी गर्भावस्थेच्या १२ आठवड्यांच्या आत सिकलसेल व थॅलेसेमियाची तपासणी करून घ्यावी. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास तातडीने सीव्हीएस (CVS) चाचणी करून पुढील उपचार सुरू करावेत.” तसेच डॉ. छाया उईके यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना व आशा स्वयंसेविकांना गरोदर मातांचे या आजारांबाबत व्यापक समुपदेशन करण्याचे निर्देश दिले.
अध्यक्षीय भाषणात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांनी जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाची घोषणा केली. त्या म्हणाल्या, “गडचिरोली जिल्ह्यातील सिकलसेल व थॅलेसेमियावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी लवकरच महिला व बाल रुग्णालय येथे ‘कोरिओनिक व्हिलस सॅम्पलिंग’ (CVS) तपासणी केंद्र सुरू करण्यात येणार आहे. यामुळे गर्भाशयातील बाळाला हा आजार आहे की नाही हे वेळेत ओळखून आजारग्रस्त बालकांचा जन्म रोखण्यास मोठी मदत होणार आहे.”
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी सिकलसेल समुपदेशक श्रीमती रामटेके (PHN), नीता बालपांडे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ स्वप्नील चापले, रचना फुलझेले तसेच HLL टीमच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. या शिबिराला गरोदर माता व रुग्णांचा मोठा प्रतिसाद मिळाला.



