अवैध दारूसह १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

दोघांना अटक ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
गडचिरोली : स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने पोरेड्डीवार इंजिनिअरिंग कॉलेज, बोदली परिसरात सापळा रचून असताना दोन वाहने समोरून येताना दिसताच त्यांना थांबवून वाहनांची तपासणी केली असता, त्यात रॉकेट देशी दारूचे १३० खरड्यांचे बॉक्स मिळून आले. सदर दारूचे बॉक्स व दारू वाहतुकीकरिता वापरलेले चारचाकी वाहन असा एकूण १२ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल मंगळवारी जप्त केला.
विधानसभा निवडणुकच्या मतदान प्रक्रियेवर प्रभाव टाकण्यासाठी बऱ्याच दारु विक्रेत्यांकडून छुप्या मार्गाने शेजारील चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात अवैध मद्यपुरवठा करून जिल्ह्याच्या विविध भागांत पोहोचविण्याची दाट शक्यता असते. स्थानिक गुन्हे शाखेची चमू निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली परिसरात गस्त घालत होती. दरम्यान, गोपनीय सूत्रांकडून पोलिसांना दारूतस्करीची माहिती मिळाली. शहरातील गोकुळनगर परिसरातील दारूविक्रेता आकाश भरडकर हा त्याचा साथीदार रोशन लोखंडे याच्या मदतीने ब्रह्मपुरी येथून गडचिरोली परिसरात अवैध देशी व विदेशी दारूची वाहतूक करीत होता. ही दारू कसनसूर येथील मनोज मुजुमदार व क्रिष्णा मुजुमदार यांना पुरवठा करणार होता.
सदर माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने पोरेड्डीवार इंजिनिअरिंग कॉलेज, बोदली परिसरात सापळा रचून असताना खबरेतील दोन वाहने समोरून येताना दिसताच त्यांना थांबवून वाहनांची तपासणी केली असता, त्यात रॉकेट देशी दारूचे १३० खरड्यांचे बॉक्स मिळून आले. आरोपी आकाश भाऊराव भरडकर, रा. गोकुळनगर, रोशन हरिदास लोखंडे, रा. उंदरी, ता. उमरेड, जि. नागपूर यांना अटक करून त्यांचे व पाहिजे असलेले आरोपी मनोज मुजुमदार, रा. एटापल्ली व क्रिष्णा मुजुमदार, रा. कसनसूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.



