
५ तालुक्यांतील ४५ पोटजातींमधील नागरिकांची विक्रमी उपस्थिती ; उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत थेट देशाच्या राष्ट्रपतींना धाडले निवेदन
कुरखेडा : “आदिवासी हा या देशाचा खरा मूलनिवासी असून जल, जंगल आणि जमिनीचा निसर्गदत्त मालक आहे. असे असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्ली येथील एका कार्यक्रमात आदिवासी बांधवांचा ‘वनवासी’ असा उल्लेख करून समस्त मूलनिवासी समूहाचा आणि संवैधानिक मूल्यांचा घोर अपमान केला आहे,” असा थेट आरोप करत गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी समाज कमालीचा आक्रमक झाला आहे. या शब्दप्रयोगाच्या निषेधार्थ आणि गृहमंत्री अमित शाह यांनी देशाची जाहीर माफी मागावी, या प्रमुख मागणीसाठी कुरखेडा येथे सोमवारी हजारो आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत एक प्रचंड आणि ऐतिहासिक आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा, कोरची आणि धानोरा या पाचही तालुक्यांतील आदिवासी समाजाच्या तब्बल ४५ पोटजातींमधील अबालवृद्ध नागरिक आणि सर्वपक्षीय नेते या आंदोलनात पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि निळ्या-हिरव्या झेंड्यांसह मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आंदोलनाची सुरुवात स्थानिक बिरसा मुंडा चौक (नवीन बसस्थानक) येथून झाली. हातात निषेधाचे फलक घेऊन आणि “आदिवासींवर अन्याय करणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध असो”, “आम्ही वनवासी नव्हे, मूलनिवासी आहोत” अशा गगनभेदी घोषणा देत हा विराट मोर्चा मुख्य मार्गाने पुढे सरकला. संपूर्ण कुरखेडा शहर आदिवासी बांधवांच्या घोषणांनी दणाणून गेले होते. त्यानंतर हा मोर्चा थेट उपविभागीय अधिकारी (एसडीओ) कार्यालयावर धडकला.
मोर्चा एसडीओ कार्यालयावर धडकल्यानंतर, तिथे आयोजित सभेत विविध आदिवासी नेत्यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर कडक शब्दांत प्रहार केला. “भारतीय संविधानाने आम्हाला ‘आदिवासी’ म्हणून संवैधानिक दर्जा आणि हक्क दिले आहेत. ‘वनवासी’ हा शब्द आमची ओळख पुसण्याचा आणि आम्हाला दुय्यम ठरवण्याचा मानहानीकारक प्रयत्न आहे. त्यामुळे भविष्यात केवळ ‘आदिवासी’ याच शब्दाचा अधिकृत वापर करण्यात यावा,” अशी आग्रही मागणी नेत्यांनी केली. या संदर्भातील मागण्यांचे आणि आदिवासी समाजाच्या इतर प्रलंबित प्रश्नांचे सविस्तर निवेदन उपविभागीय अधिकारी किरण वाघस्कर यांच्यामार्फत देशाच्या राष्ट्रपतींना पाठविण्यात आले.
या ऐतिहासिक आंदोलनाला विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला. मोर्चामध्ये आमदार रामदास मसराम, आदिवासी समस्त ४५ पोटजाती समाज संघटनेचे अध्यक्ष तिमेश्वर कोरेटी, रामसुराम काटेंगे, आदिवासी कंवर समाजाचे मार्गदर्शक डॉ. मेघराज कपूर, आदिवासी हलबी जमातीचे जिल्हाध्यक्ष शालीकराम मानकर, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष माधव गावळ, आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष नसिर हाशमी, संजय कोकोडे, माजी जि.प. सदस्य प्रभाकर तुलावी, माजी सभापती गिरीधर तितराम, गोविंद टेकाम, शशिकांत मडावी, दिलीप घोडाम, अरुण सोयाम, प्रभाकर जुमनाके, आशा तुलावी, गुलाब सोनकुकरा, श्रीराम दुगा, संध्या नैताम, प्रतिभा सिडाम, निलकंठ आलाम, चिरकुटा नैताम, विजय तुलावी, धरमदास उईके, गणेश काटेंगे, श्रीराम मडावी, तसेच काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जीवन नाट, जयंत हरडे, कोरची तालुका अध्यक्ष मनोज अग्रवाल, वसिम शेख, देसाईगंज तालुका अध्यक्ष राजेंद्र बुल्ले आणि परसराम टिकले यांच्यासह हजारो आदिवासी बांधव, महिला व युवक या आंदोलनात सहभागी झाले होते.



