गोंदियाविदर्भ

हिवताप नियंत्रणासाठी स्थलांतरित लोक आणि आश्रमशाळेतील मुलांवर ‘वॉच’ ठेवा

जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. चव्हाण यांचे निर्देश ; गोंदियात किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा

गोंदिया: गोंदिया जिल्हा हिवतापाबाबत (मलेरिया) संवेदनशील असल्याने आणि भातशेती तसेच तलावांमुळे डासांच्या पैदाशीला पोषक वातावरण असल्याने, किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाची जिल्हास्तरीय आढावा सभा २० नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात संपन्न झाली. यावेळी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद चव्हाण यांच्यासह सहाय्यक संचालक हिवताप (नागपूर) कार्यालयाचे कीटक शास्त्रज्ञ सचिन लकारे व नंदकिशोर भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद चव्हाण यांनी गोंदिया जिल्ह्यात वर्षभर हिवतापाचे रुग्ण आढळत असल्याने, केवळ डासांना नाही, तर डासअळीला सुद्धा नष्ट करणे गरजेचे असल्याचे सांगितले. हिवताप नियंत्रणासाठी स्थलांतरित लोक आणि आश्रमशाळेतील मुलांवर विशेष ‘वॉच’ ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. हिवताप रोखण्यासाठी लोकसहभाग आणि इतर विभाग तसेच स्वयंसेवी संस्थांचा सहभाग आवश्यक असून, नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळणे नियमित करावे, असे आवाहन डॉ. चव्हाण यांनी केले. आरोग्य कर्मचारी व आशासेविकांनी गावपातळीवर आरोग्य शिक्षण देऊन लोकांच्या सवयी बदलण्यावर (Social Behaviour Change) लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी कीटक शास्त्रज्ञ सचिन लकारे यांनी स्थानिक व बाहेरील स्थलांतरित लोकांमुळे पसरणाऱ्या प्रादुर्भावावर प्रतिबंधात्मक उपाययोजनांविषयी मार्गदर्शन केले. डॉ. चव्हाण यांनी हिवताप, मेंदूज्वर, चिकुनगुनिया, डेंग्यू, हत्तीपाय यांसारख्या जलजन्य व किटकजन्य आजारांची संख्या कमी करण्यासाठी नियमित गृहभेटी सर्वेक्षण आणि प्रभावी पर्यवेक्षण. आश्रमशाळेतील १०० टक्के विद्यार्थ्यांची रक्त तपासणी आणि स्थलांतरित लोकांची RDK किटद्वारे मलेरिया तपासणी करणे. डासांची पैदास रोखण्यासाठी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने संडास-बाथरूमच्या पाईपला व्हेंट जाळी बसविणे, डासअळी नाशक पद्धती आणि जैविक बाबींचा वापर. शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी जनजागृती साहित्य प्रदर्शित करण्याच्या सूचना दिल्या:

या बैठकीत सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी कार्यक्षमतेने काम करावे आणि लाभार्थ्यांपर्यंत सेवा प्रभावीपणे पोहोचवावी, असे निर्देश डॉ. चव्हाण यांनी दिले. सभेत तालुकास्तरीय किटक शास्त्रज्ञ, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, तालुकास्तरीय पर्यवेक्षक, आरोग्य निरीक्षक उपस्थित होते. बैठकीच्या यशस्वीतेसाठी हिवताप विभागाचे आशिष बल्ले, पंकज गजभिये व वर्षा भावे यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button