
मलेरिया आणि डेंग्यू निर्मूलनासाठी आरोग्य विभागाच्या सहकार्याने ‘कोरडा दिवस’ आणि ‘मच्छरदाणी वापरा’चा संदेश
गोंदिया : केंद्र शासनामार्फत कार्यरत असलेल्या फैमिली हेल्थ इंडिया (Family Health India) एम्बेड प्रोजेक्ट या अशासकीय संस्थेच्या माध्यमातून गोंदिया जिल्ह्यात मलेरिया (हिवताप) आणि डेंग्यूसारख्या किटकजन्य आजारांचे निर्मूलन करण्यासाठी आरोग्य आणि हिवताप विभागाच्या एकत्रित सहकार्याने व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.
देवरी, सालेकसा आणि अर्जुनी मोरगाव या हिवताप दृष्ट्या अतिसंवेदनशील तालुक्यांतील ४३ अतिदुर्गम ग्रामीण भागांतील गावांमध्ये एम्बेडने आरोग्य विभागाच्या मदतीने थेट पोहोचून जनजागृती केली आहे. या ४३ गावांमध्ये नागरिकांना मच्छरदाणीचा नियमित वापर, ‘एक दिवस कोरडा दिवस’ पाळणे आणि ‘येता कण कण तापाची – करा तपासणी रक्ताची’ या त्रिसूत्रीवर जनजागृती करण्यात आली. आशा सेविका व महिला मंडळाच्या मदतीने गावातील नागरिकांना बैठकांमध्ये बोलावून मलेरिया आणि डेंग्यू कशाप्रकारे पसरतात, मच्छरदाणीचा वापर कसा करावा आणि कोरडा दिवस पाळण्याचे महत्त्व प्रात्यक्षिकांसह समजावून सांगण्यात आले.
गडेगाव येथे झालेल्या कार्यक्रमात गोंदिया जिल्हास्तरीय समन्वयक कांचन बिसेन, परसोडी उपकेंद्रातील समुदाय आरोग्य अधिकारी गुरनुले, आरोग्य सेवक टेंभुर्णीकर आणि आशा सेविका व कम्युनिटी स्वयंसेवकांसह गावातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वयंसेवक आणि समुपदेशकांमार्फत नागरिकांना आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळणे, घरासमोर पाणी साचू न देणे, फ्रीज व कुलरमधील पाणी नियमित बदलणे, पाण्याचे टँक व बॅरेल स्वच्छ ठेवणे, तसेच सायंकाळी दरवाजे आणि खिडक्या बंद ठेवणे यासारखे विविध आरोग्य शिक्षण देण्यात येत आहे. आजाराची लक्षणे दिसताच तात्काळ रक्त तपासणी करण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.



