गडचिरोलीविदर्भ

एटापल्लीतील रस्त्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्वासन ; माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांची आंदोलनस्थळी भेट

एटापल्ली : तालुक्यातील मुख्य रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात स्थानिक पत्रकार संघटनांनी पुकारलेल्या बेमुदत साखळी उपोषणाला आता राजकीय वजन प्राप्त झाले आहे. अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी उपोषणस्थळाला भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली. या प्रश्नी जिल्हाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तात्काळ बोलून तातडीने मार्ग काढण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

एटापल्ली तालुका दौऱ्यावर असताना राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी विशेषतः उपोषण मंडपाला भेट दिली. यावेळी ‘व्हाईस ऑफ मीडिया’ आणि ‘एटापल्ली प्रेस असोसिएशन’च्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यांच्या दयनीय अवस्थेमुळे नागरिक, रुग्ण आणि विद्यार्थ्यांना सोसाव्या लागणाऱ्या हालअपेष्टांची माहिती दिली. एटापल्ली–देवदा–गडचिरोली, एटापल्ली–जारावंडी आणि एटापल्ली–हेडरी–गट्टा या मार्गांची अवस्था पाहता, प्रशासनाने याकडे केलेले दुर्लक्ष क्लेशदायक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

पत्रकारांच्या मागण्या रास्त असल्याचे नमूद करत राजे अम्ब्रीशराव आत्राम म्हणाले की, “रस्त्यांच्या या बिकट स्थितीमुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. मी स्वतः या संदर्भात जिल्हाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) अधिकाऱ्यांशी तातडीने चर्चा करणार आहे. रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम लवकरात लवकर सुरू व्हावे, यासाठी माझा पाठपुरावा राहील.”

यावेळी युवा नेते कुमार अवधेशराव बाबा आत्राम, भाजपा जिल्हा सचिव मोहन नामेवार, तोडसाचे उपसरपंच प्रशांत आत्राम यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

माजी मंत्र्यांच्या या आश्वासनानंतर प्रशासकीय पातळीवर काय हालचाली होतात, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, जोपर्यंत प्रत्यक्ष कामाला गती मिळत नाही, तोपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार पत्रकार संघटनेने कायम ठेवला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button