
एटापल्ली : अतिदुर्गम व आदिवासी बहुल परिसरातील शेकडो महिला भगिनींनी राखी बांधून मला दिलेला आशीर्वाद हा मोलाचा असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केले.
तालुक्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त हेडरी येथे भव्य रक्षा बंधन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी परिसरातील शेकडो महिलांनी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांना राखी बांधून दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमात माजी पंचायत समिती सदस्य हर्षावर्धन बाबा आत्राम, माजी जिप सदस्य संजय चरडुके, माजी जिप सदस्य राम कत्तीवार, पुरसलगोंदीच्या सरपंच अरुणा सडमेक, चंदू दोरपेटी, कमलापूरचे माजी सरपंच सांबय्या करपेत, मांतय्या आत्राम, संभा हिचामी, पापा पुण्यमुर्तीवार, कवडो पाटील, लक्ष्मण नरोटे, पंचायत समितीचे माजी उपसभापती जनार्दन नल्लावार, पांडू कोलामी, सुगंधा उराडे, कैलास कोरेत, बाळू राजकोंडावार, नगरसेवक रमेश टिकले तसेच परिसरातील विविध गावातील कार्यकर्ते व इतरही बंधू, भगिनी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी रक्षाबंधन निमित्ताने हेडरी सारख्या अतिदुर्गम भागात कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित केला आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमात परिसरातील शेकडो भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मला दिलेला आशीर्वाद जन्मोजन्मी मी विसरणार नाही असे म्हटले. एवढेच नव्हे तर माझ्या लाडक्या बहिणींच्या उज्वल भविष्यासाठी दिवसरात्र एक करणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
दरम्यान हेडरी गावात मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे आगमन होताच आदिवासी पारंपारिक नृत्य आणि त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. आयोजित कार्यक्रमात रक्षाबंधनानंतर मंत्र्यांच्या हस्ते लाडक्या भगिनींना साडीचोळी व भेटवस्तू स्वरूपात ओवाळणी देण्यात आली. आलेल्या लाडक्या बहिणींसाठी कार्यकर्त्यांकडून जेवणाची उत्तम सोय करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास कोरेत यांनी केले.
पारंपारिक रेला नृत्यावर मंत्र्यांनी धरला ठेका
एटापल्ली तालुक्यातील हेडरी गावात आयोजित रक्षाबंधन कार्यक्रमानिमित्त राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम गेले असता परिसरातील आदिवासी बंधू भगिनींनी त्यांच्या स्वागतासाठी रेला नृत्त्यासह इतर नृत्य सादर केले. यावेळी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी देखील रेला नृत्यामध्ये ठेका धरला आणि उपस्थितामध्ये उत्साह निर्माण केला.



