दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विभागीय क्रीडा संकुल प्रशासनाला घातला २१ कोटी ५९ लाखांचा गंडा

मैत्रिणीला गिफ्ट केला फोर बीएचके ; कर्मचाऱ्याजवळ बीएमडब्ल्यूसह डायमंडचा चष्माही
छत्रपती संभाजीनगर : १३ हजार रुपये पगार असणाऱ्या दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांनी इंटरनेट बैंकिंगच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुल प्रशासनाला २१ कोटी ५९ लाख ३८ हजार २८७ रुपयांचा गंडा घातला. या पैशातून आरोपीने बीएमडब्ल्यू कार, बीएमडब्ल्यू बाइक खरेदी केली, तर मैत्रिणीसाठी विमानतळासमोरील अपार्टमेंटमध्ये ४ बीएचके फ्लॅट विकत घेतला आहे. शहरातील नामांकित ज्वेलर्समध्ये डायमंडचा चष्माही बनवायची ऑर्डर दिली होती, तर दुसऱ्या महिला कंत्राटी कर्मचाऱ्याच्या पतीने ३५ लाखांची एसयूव्ही कार खरेदी केली आहे, अशी धक्कादायक माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
हर्षकुमार अनिल क्षीरसागर (रा. बीड बायपास) असे मुख्य आरोपीचे नाव असून तो एसयूव्ही कार घेऊन फरार झाला आहे. यशोदा जयराम शेट्टी (३८), बी. के. जीवन (४७, दोघे रा. गारखेडा), अशी पोलिस कोठडीतील आरोपींची नावे आहेत. या दोन आरोर्पीना २३ ते २७ डिसेंबर रोजीपर्यंत म्हणजे ५ दिवसांची जिल्हा न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणी क्रीडा अधिकारी तेजस दीपक कुलकर्णी यांनी जवाहरनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. या प्रकरणाची पुढील चौकशी आर्थिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अशोक अवचार करीत आहेत. दरम्यान, या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक एम. एम. सय्यद यांच्या पथकाने क्रीडा अधिकारी कार्यालयातील दोन वरिष्ठ लिपिकांची कसून चौकशी केली आहे.
आरोपी हर्षकुमार क्षीरसागर याने विभागीय क्रीडा संकुल समितीच्या बैंक खात्यातून २१ कोटी ५९ लाख ३८ हजार २८७ रुपयांची रक्कम स्वतःच्या बँक खात्यात वळवून घेतली. ही रक्कम बँकेतील तब्बल १२ खात्यांमधून फिरवली आहे. यापैकी आरोपी क्षीरसागर याच्या एका खात्यात ३ कोटी रुपये आढळून आले. या सर्व बँकांना हे खाते फ्रीज करण्यासाठी पोलिस प्रशासनाने पत्रव्यवहार केला आहे.
पोलिसांनी आरोपी यशोदा शेट्टी, बी. के. जीवन यांना सोमवारी न्यायालयात हजर केले. सरकारी वकील बोलत असताना यशोदा कोर्टरूममध्ये ढसाढसा रडली. दरम्यान, पोलिसांनी १४ दिवसांची पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती.



