गडचिरोलीविदर्भ

झिंगानूर विकासापासून कोसो दूर : मूलभूत सुविधांसाठी ग्रामस्थांचा संघर्ष

महाविद्यालयाची मागणी, सिंचन प्रकल्पाचा अभाव, कनेक्टिव्हिटीचा प्रश्न आणि बेरोजगारांची वाढती संख्या अशा अनेक समस्या ; मागण्या पूर्ण न झाल्यास राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचा आंदोलनाचा इशारा

सिरोंचा : तालुक्यापासून सुमारे ६० किलोमीटर अंतरावर असलेले आदिवासी आणि अतिदुर्गम झिंगानूर गाव आजही विकासापासून कोसो दूर आहे. मूलभूत सुविधांच्या अभावामुळे येथील ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांनी नुकतीच झिंगानूर गावाला भेट दिली असून, मागण्या पूर्ण न झाल्यास विराट जनआंदोलनाचा इशारा दिला आहे.

सन १९७२ मध्ये शासकीय आदिवासी आश्रम शाळा उघडण्यात आली असली, तरी आजही या शाळेत महाविद्यालयात रूपांतर करण्यात आलेले नाही, ज्यामुळे उच्च शिक्षणापासून तरुण पिढी वंचित आहे. गावात कोणत्याही बँकेची सोय उपलब्ध नाही. शुद्ध पिण्याच्या पाण्याची तीव्र समस्या असून, मोबाईल फोन नेटवर्कची सोय नसल्यामुळे संपर्क साधणे कठीण होते.  झिंगानूर ते रमेशगुडम (८ किमी) या गावाला लागून असलेल्या बारमाही वाहणाऱ्या इंद्रावती नदीतून उपसा जलसिंचन योजना राबविण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. येथील जमिनीतील पाण्याची पातळी खोल असल्याने हजारो फूट खोदल्यावरही पाणी लागत नाही. झिंगानूर येथे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. झिंगानूर ते सिरकोंडा (१७ किमी) आणि सिरकोंडा ते रोमपल्ली (८ किमी) अशा एकूण २५ किमी लांबीच्या मुख्य रस्त्यावर अनेक नवीन पुलांची प्रतीक्षा आहे. झिंगानूरपासून ५ किमी अंतरावर असलेला नैगुंडा नाला पूलही प्रतीक्षेत आहे. झिंगानूर ते मंगीगुडम रस्ता काही वर्षांपासून दुरुस्त झालेला नाही. झिंगानूर ते मंगीगुडम वाया अमडेली व सिरोंचा हा जुना पाय रस्ता पक्का करणे आवश्यक आहे. झिंगानूर गावात पुरेसा विद्युत पुरवठा आवश्यक आहे. झिंगानूर ते पुल्लीगुडम (६ किमी) हा रस्ता वनविभागाकडून बांधकाम करण्यात यावा अशी मागणी आहे. झिंगानूर चेक नं. १, झिंगानूर चेक नं. २, झिंगानूर माल, वडदेली या गावांमध्ये शेतकऱ्यांना शेतपीक घेण्यासाठी पाण्याची सोय नाही. येथील बेरोजगार तरुणांना कोणतीही कामे मिळत नाहीत. उच्चशिक्षित असूनही स्थानिक नोकऱ्या मिळत नसल्याने हेच युवक रोजगारासाठी तेलंगणात स्थलांतरित होत आहेत. शेतकऱ्यांच्या सातबारावर जुनी मृत नावे कापून नवीन नावांची नोंद घेणे आवश्यक आहे. केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजनांपासून येथील शेतकरी वंचित आहेत. शासन व प्रशासन आदिवासी भागातील विकासाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.

या समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार संघटना प्रदेश अध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांनी झिंगानूरला भेट देऊन येथील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी प्रामुख्याने झिंगानूर परिसरात उभे असलेले मोबाईल टॉवर तात्काळ सुरू करण्यात यावे आणि या परिसरामध्ये बीएसएनएलचा नवीन टॉवर उभारून दूरसंचार सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली. अन्यथा, राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने विराट जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा डॉ. खुणे यांनी यावेळी दिला.

यावेळी झिंगानूर गावाचे प्रथम नागरिक सरपंच नीलिमा मडावी, दक्षता समिती सदस्य तथा माजी सरपंच कारेजी मडावी, माजी ग्रामपंचायत सदस्य व समाजसेवक रामचंद्र कुमरी, गावातील बचत गटांच्या महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी प्रशासनाने तातडीने या भागाकडे लक्ष देऊन येथील नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button