गोंदियाविदर्भ

जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांनी घेतला कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा

जिल्ह्यात हिवताप निर्मूलनासाठी आरोग्य विभाग सतर्क; ‘आशा‘ व आरोग्य कर्मचाऱ्यांना सामाजिक वर्तणुकीत बदलाचे आवाहन

गोंदिया : गोंदिया जिल्हा हा भातशेती आणि तलावांसाठी प्रसिद्ध असला, तरी येथील पाणीयुक्त चिखल आणि घनदाट जंगल डासांच्या पैदासीसाठी पोषक ठरत आहे. या पार्श्वभूमीवर, “जिल्ह्यात हिवतापाचा प्रसार रोखायचा असेल, तर केवळ डास मारून चालणार नाही, तर त्यांच्या अळ्यांचाही नायनाट करणे अनिवार्य आहे,” असे प्रतिपादन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद चव्हाण यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित ‘कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या’ जिल्हास्तरीय आढावा सभेत ते बोलत होते. यावेळी नागपूर कार्यालयाचे कीटक शास्त्रज्ञ सचिन लकारे आणि नंदकिशोर भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती.

आढावा सादरीकरण करताना डॉ. विनोद चव्हाण यांनी गोंदिया जिल्ह्याच्या विशिष्ट भौगोलिक परिस्थितीवर प्रकाश टाकला. पोषक वातावरण: भातशेतीसाठी लागणारा पाणीयुक्त चिखल, जिल्ह्यातील असंख्य तलाव आणि घनदाट झाडी यामुळे डासांच्या उत्पत्तीला मोठ्या प्रमाणात वाव मिळतो. स्थलांतरित मजूर: जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या मजुरांमुळे हिवतापाचा प्रसार बाराही महिने होत असतो. उपाययोजना: हिवताप, डेंग्यू, चिकुनगुनिया, मेंदूज्वर आणि हत्तीपाय यांसारख्या आजारांना रोखण्यासाठी केवळ आरोग्य विभागच नव्हे, तर लोकसहभाग, ग्रामपंचायत आणि एनजीओ (NGO) यांचा समन्वय आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

कीटकजन्य आजार नियंत्रणासाठी जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची १०० टक्के रक्त तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ग्रामपंचायतींच्या सहकार्याने संडास-बाथरूमच्या व्हेंट पाईपला जाळ्या बसविणे, जेणेकरून डासांचा प्रवेश रोखता येईल. मजुरांच्या वस्त्यांवर आणि स्थलांतरित लोकांची RDT किटद्वारे तत्काळ मलेरिया तपासणी करणे. आशा सेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी केवळ औषधोपचार न करता, लोकांच्या सवयी बदलण्यासाठी त्यांना आरोग्य शिक्षण द्यावे. डासांची पैदास रोखण्यासाठी जैविक पद्धतींचा वापर आणि नियमित फवारणी कार्यक्रमावर भर देणे.

कीटक शास्त्रज्ञ सचिन लकारे यांनी बाहेरील भागातून येणाऱ्या प्रादुर्भावावर प्रतिबंधात्मक उपाययोजना सुचवल्या. डॉ. चव्हाण यांनी सर्व आरोग्य निरीक्षक आणि पर्यवेक्षकांना त्यांच्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देत, शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत आरोग्य सेवा प्रभावीपणे पोहोचवण्याचे निर्देश दिले. मृत्यू दर शून्यावर आणण्यासाठी तातडीने उपचार मिळणे गरजेचे असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

या आढावा सभेला तालुकास्तरीय कीटक शास्त्रज्ञ, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी आणि आरोग्य निरीक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेच्या यशस्वीतेसाठी आशिष बल्ले, पंकज गजभिये आणि वर्षा भावे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button