
सुपीक जमिनींचे संपादन थांबवा ; ‘शेतकरी बचाव जनआंदोलन समिती’चे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
चामोर्शी : तालुक्यातील भेंडाळा परिसरातील सुपीक आणि बागायती शेतजमिनीवर प्रस्तावित असलेली एमआयडीसी (MIDC) रद्द करावी आणि जमिनीचे अधिग्रहण तातडीने थांबवावे, या मागणीसाठी गुरुवारी शेतकऱ्यांनी प्रशासनावर प्रचंड धडक मोर्चा काढला. ‘शेतकरी बचाव जनआंदोलन समिती’च्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात भरउन्हात शेकडो शेतकरी आपल्या बैलबंड्यांसह सहभागी झाले होते, ज्यामुळे चामोर्शी परिसर घोषणांनी दणाणून गेला.
महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ अंतर्गत जारी करण्यात आलेल्या सर्व अधिसूचना व नोटिसा तत्काळ मागे घेण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, प्रस्तावित एमआयडीसीमुळे हजारो एकर सुपीक शेतीजमीन संपुष्टात येईल. त्यामुळे या भागातील शेतकरी, शेतमजूर, भूमिहीन कामगार व ग्रामीण अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होईल. शेती हे आमचे उदरनिर्वाहाचे एकमेव साधन आहे. जमीन गेल्यास अनेक कुटुंबे बेरोजगार व विस्थापित होतील, अशी भावना आंदोलनकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली. निवेदनात प्रशासनासमोर काही महत्त्वाच्या मागण्या ठेवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये सुपीक, बागायती व सिंचनाखालील जमीन औद्योगिक प्रकल्पासाठी संपादित करू नये, संबंधित गावांतील शेतकऱ्यांची संमती घेतल्याशिवाय कोणतीही भूसंपादन प्रक्रिया राबवू नये, तसेच प्रस्तावित प्रकल्पामुळे पर्यावरण, जलस्रोत, शेती उत्पादन व ग्रामीण सामाजिक रचनेवर होणाऱ्या परिणामांचा स्वतंत्र अभ्यास करावा, अशा मागण्यांचा समावेश आहे. काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस (शप) व इतर पक्षांनी या मोर्चाला पाठिंबा दिला होता.
“शेती हेच आमचे जगण्याचे साधन आहे. जर सरकारने आमच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार केला नाही, तर आगामी काळात हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल,” असा स्पष्ट इशारा शेतकरी बचाव जनआंदोलन समितीने यावेळी दिला.
या मोर्चात काँग्रेसचे मावळते जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष अतुल गण्यारपवार, भाकपचे सचिन मोतकुरवार, मनोज पोरटे, राजेश्वर चुधरी, नरेंद्र जुवारे, देवराव चौडे, शिवसेना ठाकरे गटाचे पवन गेडाम, सुधाकर गद्दे, रत्नमाला पावडे यांच्यासह विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते व भेंडाळा, खंडाळा, डोटकुली, पारसगड, रामाळा, मोहुर्ली, फराडा, पेंढरी, अवळी, वेलतुर, कान्होली, नवेगाव माल, चाकलपेठ आदी गावातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



