
हृदयात छिद्र असलेल्या रिक्षाचालकाच्या चिमुरडीसाठी अमरावती ते नागपूर प्रशासन सक्रिय; शस्त्रक्रियेसह रुग्णवाहिकेचा संपूर्ण खर्च मोफत.
नागपूर : आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या आणि जन्मानंतर अवघ्या तीन दिवसांतच मृत्यूच्या दारात उभ्या ठाकलेल्या एका नवजात बालिकेसाठी मुख्यमंत्री सहायता वैद्यकीय निधी कक्ष पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे. बाळाच्या हृदयात जन्मजात छिद्र (हृदयविकार) असल्याचे निदान झाल्यानंतर निर्माण झालेली अत्यंत गंभीर परिस्थिती आणि पालकांची हलाखीची आर्थिक स्थिती लक्षात घेता, अमरावती आणि नागपूर जिल्हा कक्षाने दाखवलेल्या कमालीच्या तत्परतेमुळे या चिमुरडीला वेळेत मोफत उपचार आणि रुग्णवाहिका उपलब्ध झाली आहे. प्रशासनाच्या या संवेदनशील आणि गतिमान समन्वयामुळे एका गरीब रिक्षाचालकाच्या कुटुंबाला विळखा घालणारे मोठे संकट टळले असून चिमुरडीला जीवनदान मिळाले आहे.
मूळचे अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील रहिवासी असलेले हे कुटुंब मागील काही वर्षांपासून उदरनिर्वाहासाठी अमरावती शहरात वास्तव्यास आहे. कुटुंबातील कर्ते पुरुष भाड्याने ऑटो रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा गाडा हाकतात. तीन दिवसांपूर्वी त्यांच्या घरात एका गोंडस मुलीचा जन्म झाला. मात्र, हा आनंद फार काळ टिकला नाही. जन्मानंतर लगेचच नवजात बाळाला हृदयाशी संबंधित गंभीर आजार असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. प्रकृती वेगाने खालावत असल्याने आणि बाळ ऑक्सिजन सपोर्टवर असल्याने त्याला अमरावतीहून तातडीने नागपूर येथील नेल्सन हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले.
नागपूरच्या रुग्णालयात पोहोचल्यानंतर कुटुंबासमोर दुहेरी संकट उभे राहिले. एकीकडे खाजगी रुग्णालयातील उपचाराचा आणि ऑक्सिजनयुक्त रुग्णवाहिकेचा खर्च परवडणारा नव्हता, तर दुसरीकडे रुग्णालयाने ही शस्त्रक्रिया तीन महिन्यांनंतरच शक्य असल्याचे सांगितले. या बिकट परिस्थितीत मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष अमरावतीचे डॉ. श्याम गावंडे यांनी तात्काळ मुख्यमंत्री सहायता निधी (विदर्भ व नागपूर विभाग) चे सदस्य सचिव तथा प्रभारी अधिकारी डॉ. सागर पांडे यांच्याशी थेट संपर्क साधून तातडीच्या मदतीची याचना केली.
घटनेचे गांभीर्य आणि बाळाचा जीव धोक्यात असल्याचे पाहून डॉ. सागर पांडे यांनी कसलाही विलंब न लावता तातडीने नेल्सन रुग्णालय प्रशासनाशी समन्वय साधला. त्यांनी शासकीय स्तरावरून तांत्रिक बाजू सांभाळत नवजात बाळाला त्या रात्री सुरक्षितपणे उपचारासाठी तिथेच दाखल ठेवण्याची व्यवस्था केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी बाळाला पुढील अद्ययावत उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर येथे ऑक्सिजनयुक्त रुग्णवाहिके द्वारे अत्यंत सुरक्षितपणे हलविण्यात आले. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रक्रियेतील औषधोपचार, दाखल प्रक्रिया आणि रुग्णवाहिकेचा सर्व खर्च पूर्णपणे मोफत करण्यात आला.
डॉ. सागर पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या बाळावर शासकीय रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. तसेच तीन महिन्यांनंतर या बालिकेला आवश्यक असणारी मुख्य हृदय शस्त्रक्रिया आणि त्यानंतरचा सर्व वैद्यकीय उपचार मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिला जाणार आहे. “मुख्यमंत्री महोदयांची जनसेवेची प्रेरणा डोळ्यांपुढे ठेवूनच आम्ही विदर्भातील प्रत्येक गरजू रुग्णापर्यंत तात्काळ मदत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत,” अशी भावना डॉ. पांडे यांनी व्यक्त केली.
दरम्यान, मुंबई येथील मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी विदर्भ आणि अमरावती जिल्हा कक्षाने केलेल्या या कौतुकास्पद व संवेदनशील कामगिरीची विशेष दखल घेत त्यांचे कौतुक केले. तसेच, राज्यातील कोणत्याही आर्थिकदृष्ट्या दुर्बल किंवा गरजू नागरिकाला गंभीर आजाराच्या उपचारासाठी तातडीची मदत हवी असल्यास त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीच्या १८०० १२३ २२११ या अधिकृत टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे जाहीर आवाहन केले आहे.



