
लिसिट हायस्कूलजवळील धोकादायक वळणावर वाहनाने दुचाकीला उडवले; बहिणीला गृहप्रवेशाची पत्रिका देण्यापूर्वीच काळाची झडप
धानोरा : गडचिरोली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अपघातांचे सत्र सुरूच असून, गुरुवारी (२८ मे) सकाळी धानोरा तालुक्यातील रांगी येथे आणखी एका भीषण अपघाताची नोंद झाली. रांगीहून धानोराकडे जाणाऱ्या एका भरधाव चारचाकी वाहनाने समोरून येणाऱ्या दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत एका दुचाकीस्वाराचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
नंदू चमरशींग तुलावी (रा. खेडेगाव, मुरुमगाव) असे अपघातातील मृत व्यक्तीचे नाव आहे. आपल्या लाडक्या बहिणीला नवीन घराच्या गृहप्रवेशाचे आमंत्रण देण्यासाठी निघालेल्या नंदू यांच्यावर वाटेतच काळाने झडप घातल्याने तुलावी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
प्राप्त माहितीनुसार, सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास नंदू तुलावी हे त्यांच्या MH-33-AB-1039 क्रमांकाच्या दुचाकीने धानोराकडून रांगीच्या दिशेने येत होते. याच वेळी रांगीकडून धानोराकडे अत्यंत भरधाव वेगाने जाणाऱ्या एका चारचाकी वाहनाने लिसिट हायस्कूलजवळील धोकादायक वळणावर समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीवरून फेकले गेल्याने नंदू यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि प्रचंड रक्तस्राव झाल्यामुळे त्यांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला.
मृत नंदू तुलावी हे रांगीजवळील कोरेगाव येथे राहणाऱ्या आपल्या बहिणीच्या घरी जात होते. कुटुंबात आनंदाचा प्रसंग असल्याने बहिणीला गृहप्रवेशाची निमंत्रण पत्रिका (लग्न/गृहप्रवेश पत्रिका) देऊन त्यांना आमंत्रित करायचे होते. मात्र, कोरेगाव गाठण्यापूर्वीच काही अंतरावर त्यांच्या दुचाकीला भीषण अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली असून, त्यांचा आक्रोश उपस्थितांचे हृदय पिळवटून टाकणारा होता. या घटनेमुळे मुरुमगाव आणि रांगी परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने धानोरा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी रुग्णालयात रवाना केला आहे. अपघातास कारणीभूत ठरलेले चारचाकी वाहन धानोरा पोलिसांनी जप्त केले असून, फरार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या अपघाताचा पुढील तपास धानोरा पोलीस करत आहेत.



