गडचिरोलीविदर्भ

एकनसुर येथे दारूविक्री बंदीसह ‘दारूमुक्त लग्न’ करण्याचा ठराव ; नियम मोडल्यास ७० हजार रुपये दंड

एटापल्ली : तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकनसुर येथे ‘मुक्तिपथ’ अभियानांतर्गत सघन गाव भेट उपक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत २७ मे रोजी गाव पाटील कोतला मटामी यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेत गावात पूर्णतः दारूविक्री बंदी करण्याचा आणि लग्न समारंभ दारूमुक्त करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. गावात दारूविक्री करताना आढळल्यास संबंधिताला ७० हजार रुपये दंड ठोकण्याचा कडक नियमही करण्यात आला.

एकनसुर गावात गेल्या काही काळापासून दोन विक्रेत्यांकडून देशी व विदेशी दारूची विक्री केली जात होती. या दारूमुळे गावातील  तरुण कामावर न जाता केवळ व्यसनात बुडाले होते. इतकेच नव्हे तर गावातील ग्रामसभा, सण-उत्सव आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दारूमुळे सतत वादविवाद व भांडणे होत असल्याने गावातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली होती. तरुणांचे होणारे नुकसान आणि गावातील बिघडत चाललेले वातावरण पाहून गावकऱ्यांनी एकत्र येत यावर कडक पाऊल उचलण्याचे ठरवले. त्यानुसार ग्रामसभेत देशी व विदेशी दारूविक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. जर गावात कोणी यापुढे दारूची विक्री करताना आढळल्यास त्याला ७० हजार रुपये दंड केला जाईल, असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. तसेच गावकऱ्यांनी लग्न समारंभांमध्ये दारू पिऊन होणारे वाद आणि भांडणे कायमची मिटवण्यासाठी आता संपूर्ण गावात ‘दारूमुक्त लग्न’ पद्धत राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे गावातील लग्नकार्ये शांततेत पार पडतील आणि गावाची वाटचाल एकोपा व समृद्धीच्या मार्गाने होईल, असा विश्वास गावकऱ्यांनी व्यक्त केला.

या सघन गाव भेट उपक्रमादरम्यान मुक्तिपथचे तालुका संघटक किशोर मलेवार आणि तालुका प्रेरक समिक्षा कुळमेथे यांनी उपस्थित राहून गावकऱ्यांना व्यसनमुक्ती व कायदेशीर बाबींविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. या ग्रामसभेला गाव पाटील कोतला मटामी, डोलेश मटामी, धर्मा मटामी, महसूल सेवक सीताराम मटामी, आशा कार्यकर्ती सरिता मटामी, अंगणवाडी सेविका पार्वती सरकार यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक, महिला व तरुण उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button