
आलदंडी गावाजवळील घटना; दुचाकीचा झाला चुराडा
एटापल्ली : तालुक्यात पुन्हा एकदा भरधाव वाहनाने निष्पाप तरुणाचा बळी घेतल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एटापल्लीपासून ७ किमी अंतरावर असलेल्या आलदंडी गावाजवळ गुरुवारी कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात २८ वर्षीय दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा साथीदार गंभीर जखमी झाला असून त्याची मृत्यूशी झुंज सुरू आहे. अनिल हिचामी असे मृत तरुणाचे नाव असून, बालाजी दुर्वा असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. दोघेही एटापल्ली तालुक्यातील परसलगोंदी येथील रहिवासी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिल हिचामी आणि बालाजी दुर्वा हे दोघे दुचाकीने एटापल्लीवरून आपल्या गावाकडे जात होते. दरम्यान, आलदंडी गावाजवळ समोरून येणाऱ्या ‘एमएच ३४ सीडी ०८००’ क्रमांकाच्या भरधाव इनोव्हा क्रिस्टा कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला. या भीषण अपघातात अनिल हिचामी याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेला बालाजी दुर्वा याला तातडीने एटापल्ली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने प्रथमोपचार करून त्याला पुढील उपचारासाठी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सध्या त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
घटनेची माहिती मिळताच आलदंडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला. अनिलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला असून, आलदंडी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. तालुक्यात सातत्याने वाढणाऱ्या रस्ते अपघातांमुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून, अशा भरधाव आणि बेजबाबदार वाहनचालकांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.



