
कोरची : तालुक्यातील मुख्य गाव म्हणून ओळख असलेल्या कोटगुल गावातून अवैध दारू हद्दपार करण्यासाठी महिला एकवटल्या आहेत. दारूविक्रीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या लक्षात घेत महिलांनी कोटगुल पोलिस मदत केंद्रात धाव घेत व्यथा मांडली तसेच विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी निवेदनातून पोलिस अधिकाऱ्यांकडे केली आहे.
कोटगुल येथे काही ठिकाणी अवैध दारूची विक्री होत असल्याने सामाजिक वातावरण बिघडत आहे. दारूच्या सेवनामुळे अनेक कुटुंबांमध्ये वाद निर्माण होत असून महिलांना व मुलांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. अशातच गावात मुक्तिपथतर्फे शक्तिपथ बैठक पार पडली. या बैठकीत गावातील महिलांनी अवैध दारूविक्रीमुळे गावावर होणारे वाईट परिणाम विषद केले. त्यानंतर एकमताने महिलांनी अवैध दारूविक्री बंदीचा ठराव घेतला. एवढेच नाही तर थेट पोलिस मदत केंद्र गाठत पोलिस अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले आहे. महिलांनी अवैध दारूविरोधात मोहीम राबवून संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच गावातील शांतता, सुव्यवस्था आणि सामाजिक आरोग्य अबाधित राखण्यासाठी दारूविक्रीवर नियंत्रण आणावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.
यावेळी संघटन अध्यक्ष नेमबाई भारद्वाज, संगीता कोवाची, सरपंच मंजुषा कुंभरे, निराबाई दूधकुवर, वनिता कुंजम, संगीता कोरेटी, शिमलाबाई कुंभरे, सुरजाबाई रामटेके, झमका कुंभरे, सचिव, प्रीती हिडामी, संघटन सचिव सावित्री सोनकलस, भारती भैसारे, रोशनी रामटेके, कचरी किंचंक, भाग्यश्री कोल्हे, केवरा सोनफुल, सरिता हारामी, गीता दर्रो, शिमला कुंभरे, सीमा अचला, प्रियंका कुंभरे, बिंदा पुडो, बिंदा पोरेटी, सावित्री, चंपा, नेहा, वनिता,उषा, रसिदा घावले, चित्रा जनबंधू आदी महिला तसेच मुक्तिपथतर्फे युवराज मेश्राम, धर्मेंद्र कुसराम उपस्थित होते.



