गडचिरोलीविदर्भ

गडचिरोलीत मुसळधार पावसाचा कहर: वीज कोसळून एकाचा मृत्यू; रपटा वाहून गेल्याने वाहतूक विस्कळीत

पोहार नदीच्या पुलाजवळ दोन ट्रक उलटले

गडचिरोली : जिल्ह्याच्या दक्षिण भागात बुधवारी (१ जुलै) संध्याकाळपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, चामोर्शी तालुक्यात वीज कोसळून एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुसळधार पावसामुळे मुत्तापूर येथील नाल्यावरील रपटा वाहून गेल्याने आणि चिखलात वाहने फसल्याने वाहतुकीचाही मोठा खोळंबा झाला आहे.

चामोर्शी तालुक्यातील रेगडी येथील कर्मवीर कन्नमवार जलाशय परिसरात मासेमारीसाठी गेलेल्या चौघांवर वीज कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. विकासपल्ली येथील अखिल बिस्वास (वय ५५), दीपक बिस्वास, निर्मल बिस्वास आणि चंद्रशेखर मंडल हे चौघे मासेमारी करत असताना अचानक पाऊस सुरू झाला. पावसापासून बचाव करण्यासाठी त्यांनी एका झाडाचा आश्रय घेतला. मात्र, दुर्दैवाने त्याच झाडावर वीज कोसळल्याने चौघेही जखमी झाले.

स्थानिकांनी त्यांना तातडीने रेगडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. यापैकी अखिल बिस्वास हे गंभीर जखमी असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी घोट येथील रुग्णालयात हलवण्यात येत होते; मात्र उपचाराला पोहोचण्यापूर्वीच वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.

मुसळधार पावसामुळे परिसरातील नद्या-नाल्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. बोरी-आलापल्ली मार्गावरील मुत्तापूर येथील नाल्यावर तयार करण्यात आलेला तात्पुरता रपटा पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे वाहून गेला. यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. अहेरी आगाराच्या एसटी बसेसना मुलचेरामार्गे वळवावे लागल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. तसेच, जोरदार वाऱ्यामुळे रस्त्यांवर अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत.

चामोर्शी-गडचिरोली मुख्य मार्गावरील पोहार नदीच्या पुलाजवळ असलेल्या पोचमार्गावर पावसामुळे मोठ्या प्रमाणावर चिखल निर्माण झाला आहे. या चिखलात अडकून दोन ट्रक उलटल्याची घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला.

गेल्या २४ तासांत जिल्ह्याच्या दक्षिण भागातील भामरागड, सिरोंचा, एटापल्ली आणि अहेरी या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर अधिक होता. पावसाची आकडेवारी: भामरागड: ७२.७ मिलिमीटर (सर्वाधिक), सिरोंचा: ३१.४ मिलिमीटर, मुलचेरा: ०.७ मिलिमीटर (सर्वात कमी)

सध्या संपूर्ण जिल्ह्यात ढगाळ हवामान असून, सकाळ आणि संध्याकाळच्या सत्रात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत आहेत. प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून, वादळी पावसाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button