गडचिरोलीविदर्भ

कॅन्सरच्या धोक्यामुळे मथुरानगरमध्ये खर्राविक्री बंद ; १२ वर्षांपासून दारूबंदीही कायम

मुक्तिपथच्या बैठकीत गावाची कौतुकास्पद यशोगाथा समोर

गडचिरोली : तंबाखू आणि खर्रा सेवनामुळे होणाऱ्या कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजाराचा वाढता धोका लक्षात घेऊन मुलचेरा तालुक्यातील गोविंदपूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मथुरानगर येथील ग्रामस्थांनी गावात ‘खर्रा’ आणि सर्व प्रकारच्या तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घातली आहे. विशेष म्हणजे, या गावात गेल्या १२ वर्षांपासून अवैध दारूविक्री सुद्धा पूर्णपणे बंद असून, आता व्यसनमुक्तीच्या दिशेने गावाने मोठे पाऊल टाकले आहे.

तंबाखूमध्ये असणाऱ्या घातक कर्करोगजन्य रसायनांमुळे अनियंत्रित पेशी वाढतात, रूपांतर पुढे कॅन्सरमध्ये होते. शासनाने तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घातली असली, तरी चोरट्या मार्गाने किराणा दुकाने किंवा पानटपऱ्यांवर खर्रा उपलब्ध होत असल्याने रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. मथुरानगर गावातही खर्रा व तंबाखू सेवनामुळे ३ रुग्णांना कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. ही गंभीर व जीवघेणी समस्या समोर येताच संपूर्ण ग्रामस्थ जागरूक झाले. गावातील परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ग्रामस्थांनी एकत्र येत गावात खर्रा व तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. या आवाहनाला प्रतिसाद देत गावातील दुकानदारांनी स्वतःहून खर्राविक्री पूर्णपणे बंद केली आहे. सध्या गावात एकाही दुकानात तंबाखूजन्य पदार्थ उपलब्ध होत नसल्याने, खर्रा प्रेमींचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

‘मुक्तिपथ’ अभियानाच्या वतीने गावात ‘शक्तीपथ पाठपुरावा बैठक’ आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ग्रामस्थ व महिलांनी गावातील या सकारात्मक बदलाची माहिती दिली. गावात गेल्या अनेक वर्षांपासून असलेली दारूविक्रीबंदी आणि आता झालेली खर्राबंदी कायम टिकवून ठेवण्यासाठी मुक्तिपथच्या वतीने महिलांना संघटित करण्यात आले. तसेच अवैध दारूविक्री पुन्हा सुरू होऊ नये यासाठी कायदेशीर उपाययोजना समजावून सांगण्यात आल्या. यासोबतच तंबाखू व खर्रा सेवनाचे आरोग्यावर होणारे भीषण परिणामही उपस्थितांना पटवून देण्यात आले.

हा आरोग्यासाठी हितकारक निर्णय घेण्यासाठी मथुरानगर येथील माजी सरपंच जुगल मंडल, माजी पोलीस पाटील निरोद मंडल, ग्रामपंचायत सदस्य मिलन गोलदार, संघटना अध्यक्ष अमृत हलदार, जयदेव मंडल, अजय रॉय, मनोज रॉय, सपन ढाली, विनोद मंडल, सुधिर मल्लिक, आशितोष मंडल आणि सुदिप मल्लिक यांच्यासह सर्व ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. गावातील या निर्णयाची मैदानी पातळीवर प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी मुक्तिपथचे तालुका संघटक रुपेश अंबादे व त्यांची टीम वेळोवेळी पाठपुरावा बैठका घेऊन ग्रामस्थांमध्ये सातत्याने जनजागृती करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button