चंद्रपूरविदर्भ

ताडोबा बफर क्षेत्रात शेतकऱ्याचा बळी घेणारा वाघ जेरबंद

वनविभागाच्या मोहिमेला यश

चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशत निर्माण करणाऱ्या आणि एका तरुण शेतकऱ्याचा बळी घेणाऱ्या हल्लेखोर वाघाला अखेर वनविभागाने जेरबंद केले आहे. शनिवारी (दि.०४) सकाळी राबविण्यात आलेल्या एका विशेष मोहिमेत या वाघाला बेशुद्ध करून ताब्यात घेण्यात वनविभागाला यश आले. या कारवाईमुळे चोरगाव आणि परिसरातील ग्रामस्थांनी मोठा सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

गेल्या शनिवारी, ताडोबाच्या बफर क्षेत्रातील चोरगाव परिसरात शेतात काम करत असताना वाघाने संजय माधवराव सिडाम या तरुण शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात संजय सिडाम यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. ते मूळचे राजुरा तालुक्यातील केळझर येथील रहिवासी असून, आपल्या सासरच्या शेतीची देखभाल करण्यासाठी चोरगाव येथे आले होते. या घटनेनंतर परिसरात वाघाची मोठी दहशत पसरली होती. संतप्त ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी या हल्लेखोर वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी वनविभागाकडे लावून धरली होती.

ग्रामस्थांच्या वाढत्या दबावानंतर ताडोबा व्यवस्थापनाने तत्काळ या हल्लेखोर वाघाला जेरबंद करण्याचा प्रस्ताव प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्याकडे पाठवला होता. या प्रस्तावास वरिष्ठ पातळीवरून तातडीने परवानगी मिळताच, वनविभागाच्या पथकाने या वाघाचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली. काही दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर, शनिवारी सकाळी वनविभागाच्या अनुभवी चमूने या वाघाला ट्रँक्विलायझर गनच्या (बेशुद्धीचे इंजेक्शन) साहाय्याने बेशुद्ध केले आणि सुरक्षितरीत्या जेरबंद केले.

वाघाचा बंदोबस्त झाल्यामुळे चोरगावसह ताडोबा बफर क्षेत्रातील शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. गेल्या आठ दिवसांपासून शेतात जाणेही धोक्याचे झाले होते, मात्र आता वाघाला जेरबंद केल्यामुळे भीतीचे सावट काही प्रमाणात दूर झाले आहे. या मोहिमेत वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी मोलाची भूमिका बजावली.

वाघाला ताब्यात घेतल्यानंतर त्याला आता सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असून, ताडोबा व्यवस्थापनाकडून पुढील प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. परिसरातील नागरिकांनी यापुढेही जंगलाच्या परिसरात वावरताना सावधगिरी बाळगावी, असे आवाहन वनविभागातर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button