गडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आंबेझरी गावात पोहोचली बस!

गडचिरोली पोलिसांच्या प्रयत्नांमुळे एसटी बससेवेचा शुभारंभ ; १५ हून अधिक गावांना फायदा

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या अथक प्रयत्नांमुळे आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सहकार्याने स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतर पहिल्यांदाच अतिदुर्गम आंबेझरी गावात बससेवा सुरू झाली आहे. यामुळे येथील नागरिकांचे जीवनमान सुसह्य होण्यास मोठी मदत होणार आहे.

जिल्हा पोलीस मुख्यालयपासून १०० किमी दूर असलेल्या आंबेझरी गावात बस पोहोचताच आनंदाचे वातावरण निर्माण झाले. गावातील नागरिकांनी पारंपरिक वाद्ये वाजवून आणि नृत्य करून बसचे स्वागत केले. शाळेतील लहान मुलांनी तिरंगा घेऊन बसचे स्वागत केले, ज्यामुळे हा क्षण अधिक अविस्मरणीय ठरला.

पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजय भोसले यांनी या बससेवेचे उद्घाटन केले. गडचिरोली-चातगाव-धानोरा-येरकड-मुरुमगाव-खेडेगाव-आंबेझरी-मंगेवाडा-जयसिंगटोला-मालेवाडा या मार्गावर ही बस आता धावणार आहे. यामुळे १५ हून अधिक गावांना याचा लाभ होणार असून, विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सोय झाली आहे.

गडचिरोली पोलीस दल केवळ कायदा व सुव्यवस्था राखण्याचेच नव्हे, तर जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याचे काम करत आहे. या प्रयत्नांतून आतापर्यंत ५०७ मोबाईल टॉवर्स उभारले गेले आहेत, तसेच ४२० किमी रस्त्यांचे आणि ६० पुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या वर्षभरात गट्टा (जा.), गर्दैवाडा, वांगेत्री, कटेझरी ते गडचिरोली आणि मरकणार ते अहेरी मार्गावरही बससेवा सुरू करण्यात आली आहे. अशा उपक्रमांद्वारे गडचिरोली पोलीस दल नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button