गडचिरोलीविदर्भ

सुभाषनगरात महिलांचा एल्गार ; अवैध दारूविक्री बंद करण्याचा निर्धार

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील सुभाषनगर येथे मुक्तिपथ आणि शक्तीपथ महिला संघटनेच्या संयुक्त बैठकीत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. गावात सुरू असलेली अवैध दारूविक्री तातडीने बंद करण्याचा निर्धार महिलांनी व्यक्त केला असून, दारूविक्रेत्यांना याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आली आहे. अन्यथा, पोलीस विभागाच्या माध्यमातून कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

सुभाषनगरमध्ये सध्या दोन दारूविक्रेते सक्रिय असून, त्यांना दारूविक्री बंद करण्याबाबत यापूर्वी सूचना देण्यात आली होती. मात्र, त्यांनी आपला अवैध व्यवसाय सुरूच ठेवला आहे. गावात सहज उपलब्ध होणाऱ्या गुळाच्या दारूमुळे व्यसनाचे प्रमाण वाढत आहे. विशेष म्हणजे, आजूबाजूच्या पाच गावांमध्ये दारूबंदी असतानाही, तेथील मद्यपी याच विक्रेत्यांकडून आपली व्यसनाची गरज भागवत आहेत.

या पार्श्वभूमीवर, 2 मे रोजी शक्तीपथ गाव संघटनेच्या महिला आणि मुक्तिपथ टीमची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत महिलांनी एकत्रितपणे दारूविक्री बंद करण्याचा ठाम निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी करत, महिलांनी दारूविक्रेत्यांना नोटीस बजावून त्वरित दारूविक्री थांबवण्याचे आवाहन केले आहे. जर विक्री सुरूच राहिली, तर अहिंसक मार्गाने कृती करून मुद्देमाल नष्ट करण्याचा तसेच पोलिसांच्या मदतीने कठोर कारवाई करण्याचा इशाराही महिलांनी दिला आहे.

यावेळी मुक्तिपथच्या नंदिनी आशा, स्पार्क कार्यकर्ते नितीन पोटे आणि महेन्द्र उसेंडी उपस्थित होते. महिलांच्या या भूमिकेमुळे सुभाषनगरात दारूबंदीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button